जूनमध्ये होणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस   

नवी दिल्ली : देशात जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी वर्तविला. यंदा देशात संपूर्ण हंगामात १०६ टक्के म्हणजे ८७ सेंमी पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याचे सचिव एम. रविचंद्रन यांनी सांगितले.यंदा केरळमध्ये मान्सूनचे १६ वर्षांनंतर प्रथमच लवकर आगमन झाले आहे. महाराष्ट्रातही मान्सून लवकर दाखल झाला. मुंबईत तर तब्बल ७५ वर्षांनंतर मान्सून लवकर दाखल झाला आहे.
 
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा आणि आसपासच्या भागात सध्या मान्सून जोरदार बरसत आहे. एप्रिल महिन्यात हवामान विभागाने यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०५ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल; तर पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. महाराष्ट्रात पावसाच्या चांगल्या सरी कोसळतील, असेही हवामान विभागाने म्हटले होते.
 
देशात ० ते ९० टक्के पाऊस अपुरा मानला जातो. ९० ते ९५ टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी, ९६ ते १०४ टक्के पाऊस सरासरी इतका, १०४ ते ११० टक्के पाऊस सरासरीपेक्षा जास्त आणि ११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस सर्वाधिक मानला जातो.एप्रिलमध्ये स्कायमेटने देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या १०३ टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. 

Related Articles